मुंबईत हरवलेला चाकरमानी आणि गाव | Koknatala Mumbaikar


Koknatala Mumbaikar
      
कोकणातील मुंबईकर - चाकरमानी 


नमस्कार वाचकमित्रहो, 

Koknatala Mumbaikar | kokanatil chakarmani ani gav गाव खेड्यांचा सर्वांगणी विकास म्हणजेच तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास झाला की राष्ट्राचा विकास आपोआपच होतो. मुख्यत्वे ग्रामीण भागातील तरुणाने गावातील सामजिक प्रश्न कसे सोडवता येतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आजचे तरूण हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ होय. परंतु सध्या ग्रामीण भागात वेगळीच परिस्थिती दिसून येते. गावातील तरुण उदरनिर्वाहासाठी शहरात पळ काढत आहेत आणि चाकरमानी म्हणून जगत आहेत. ही एक दुर्दवाचीच गोष्ट म्हणावी लागेल. मुंबईत हरवलेल्या तरुणांची मने गावाकडे वळवणे ही काळाची गरज आहे.

कधी वेळ मिळाला तर वृत्तपत्रे किंवा सामाजिक माध्यमांवर जरा फेरफटका मारा. राज्यातील एकूण ग्रामपंचायतमध्ये, गावांमध्ये किती भ्रष्ट्राचार वाढला आहे याचं वाढतं प्रमाण तुमच्या लक्षात येईल. गावपुढर्याना गावामध्ये कीती सहजरित्या ग्रामस्थ मंडळींच्या टाळू वरचं लोणी खायला मिळतं, शासनाच्या योजना खायला मिळतात. याची जाणीव होईल. गावातील दोन-चार भ्रष्ट्राचारी सदस्यांना, कमिटी मेंबर्सना आपल्या बाजूने वळवुन, भ्रष्ट्राचाराचे भागीदारी करून अखंड गावाला लुटायचं काम हे करत असतात. परिणामी संपूर्ण गावाच्या प्रगतीला खुंट बसतो. गावात फुटीचं राजकारण करायचं, जातीयवाद पेटवून द्यायचा एवढीच त्यांची कामे. निवडुनिकीचा कालावधी जवळ आला की दारूच्या पार्ट्या, बकरं, कोंबड कापायचं, सगळया गावकऱ्यांना खुश ठेवायचं. वर नोटांचं बंडल मिळतं ते वेगळच. गावकरी मंडळीही बिचारी काय करणार? जे कधी नव्हतं ते निवडणुकीच्या वेळी भरभरून मिळतं ते का सोडायचं ? हा विचार करून त्यांची साथ देतात. अगदी वरपर्यँत ह्यांचे हिस्से पोहचलेले असतात. आणि हे लबाड राजकारणी पुन्हा गावाला पाच वर्षे लुबाडायला तयार.


तुम्हीच सांगा कसं थांबवणार हे? कसं शक्य आहे? आजचा सुशिक्षित तरुण वर्ग तर पैसे कमवायला मुंबईत गेला आणि चाकरमानी झालाय. गावात उरलं कोण आहे ? त्या गरीब जनतेला लूबाडून ह्यांनी मात्र मोठे-मोठे बंगले बांधले, गाड्या घेतल्या आणि पुढच्या निवडुकीला नोटांचे बंडल वाटून, पुरून उरेल असा अनेक बँक खात्यात 'गावाचा विकास' जमा करून ठेवलाय. असाच एखादा चाकरमानी सणा-सुदीला गावी गेला, आणि वाडीतील काही लोकांना एकत्र करून सांगायचा प्रयत्न केला की, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं. "तुला काय माहित यातलं?? तू चार दिवस येऊन, नाचून जाणार. आम्हाला इथे आमच्या कामांतून पुरसत मिळत नाही. तुला जर एवढंच वाटतं असेल तर तू जा पंचायत मध्ये, करून घे गावाचा विकास ''. बस्स..! मग तो ही विचार करतो, जाऊ दे..! ह्या लोकांनाच असं जगायची सवय झालीय, काही कोणाला पडली नाही आहे, ह्यांचाच वाडीमध्ये एकमेकांशी धड ताळमेळ नाही तर मग मी का माझी रजा वाया घालवू ? चालू द्या, जसं चालतय तसं. आणि हेच त्याचं चक्र वर्षभर सुरू असतं.

कुठेतरी वाचलंय, भ्रष्ट्राचार करणं पाप आहे, भ्रष्ट्राचार सहन करणं पाप आहे. आणि भ्रष्ट्राचार होतोय आणि मी काही न करता फक्त दुरुन पाहतोय, हे त्याहून मोठं पाप आहे. तू का होत आहेस पापाचा भागीदार? गावातील तुझ्या लोकांना भ्रष्टाचाऱ्याच्या विळख्यातून सोडवणं हे काय तुझं कर्तव्य नव्हे काय? हे चाकरमान्या, त्यांच्या डोळ्यांवर बांधलेली आंधळेपणाची पट्टी काढायला त्यांना भाग पाड. त्यांना कुंभकर्णाच्या झोपेतून जागं कर. गावातील तुझ्या भोळ्या भावंडावर, बिचाऱ्या गरीब लोकांवर होणारा अत्याचार पाहून तुझं रक्त सळसळत कसं नाही? तुझं मन पेटून कसं उठत नाही? तुझी गावी असणारी भावंड, म्हातारे आजी-आजोबा, तुझे सवंगडी आणि इतर तुझी माणसं, ज्यांच्या सोबत तू लहानाचा मोठा झालास, ज्या मातीत तू खेळलास, त्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे आता. ऊठ ! जागा हो ! आणि इतरांनाही जागं कर. आज झोपलास तर तुझ्या कित्येक पुढील पिढ्या भ्रष्ट्राचाराच्या या अग्नीत होरपळत राहतील हे लक्षात घे. गावातील भरकटलेल्या तुझ्या भावडांच्या डोळ्यात सत्य परिस्थितीचं अंजन घाल, त्यांना भानावर आण. मग त्यात तुझा मान-अपमान झाला तरी चालेल. जे येतील त्यांना सोबत घेऊन, जे नाही येणार त्यांच्या शिवाय, गावाला विकासपथावर घेऊन जा. मग त्यात तू मागे हटू नकोस. भ्रष्ट्राचार मुळासकट गावातून उपटून टाक. फक्त तू एक पाऊल उचल, भ्रष्टाचाराला कंटाळलेली गावातील हजारों पावलं तुझ्या मागून येतील. त्यांना योग्य दिशा दाखव. यापुढे गावातील गरीब लोकांचा १ रुपया ही घशात घालताना कोणीही १०० वेळा विचार करील अशी भ्रष्ट्राचारी पुढार्यांना अद्दल घडव.

तु कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन करतोस हा विषय महत्त्वाचा नाही. गावाच्या विकासासाठी खरंच तुझी तळमळत असेल, तर राजकारणात वाहून मात्र जाऊ नकोस. मूळात गावाचा विकास आणि कुठलाही राजकीय पक्ष यात तु तडजोड करता कामा नये. गावातील विकास कामे, लोकांचा विकास, तुझा वैयक्तिक विकास कोणत्याही राजकीय पक्षाच्या मेहरबानीवर अवलंबून ठेवू नये, त्यास बळी पडू नयेत. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार यांसारख्या गावाला राजकारणाची तिळमात्र झळ नव्हती म्हणूनच राज्यात अशी कित्येक गावे 'आदर्श गावे' म्हणून उदयास आली.

स्पर्धेच्या युगात आनंदासाठी धावपळ करणाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देतानाच आपला गाव, समाज यांकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी मुख्य म्हणजे गावातील आणि मुंबईतील तरुण वर्गाने पुढाकार घेऊन एकत्र व्हायला हवे. ग्रामपंचायत वा सरकारी योजना गावात राबवून गावतील अनेक प्रश्न नक्कीच सोडवता येतील. तेव्हाच त्यांना खरा आनंद मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अश्या कित्येक थोर महापुरुषांनी लोककल्याणासाठी स्वतःला झोकून दिले ते दुसऱ्यांसाठी जगल्यामुळेच. त्यांचे विचार व कार्य चिरकाल टिकणारे आहेत. अश्याच महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, चला एकत्र होऊया ! ठेवूनि एकचि ध्यास ! गाव-खेड्यांचा संपूर्ण विकास...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या