माझं गाव
My village poem marathi
माझं गाव ! माझं गाव, अगदी लहानसं खेडेगाव
विशाल गडाच्या पायथ्याशी वसलेले माझं गाव !
माझ्या या गावाची किमया न्यारी, प्रत्येकाच्या मनोमनी
रत्नागिरी जिल्ह्यात, लांजा तालुक्यातील माझं गाव, पालू गाव
पालू फाट्यावरील कमानीचा, थाटच आहे वेगळा
जो तो म्हणतो, असा कसा हा गाव आगळावेगळा
रवळनाथ, महापुरुष मंदिरांची कीर्ती महान
जोडीला विठ्ठल रुखमाई, गणेश मंदिरं खूप छान
येथे शिमगोत्सवाची धमाल आहे खूप न्यारी
देवाची पालखी येते घरोघरी
रवळनाथच्या पालखीने गाव सारे दुमदुमते
देवाचे रूप पाहून मन साऱ्यांचे भारावते
गुढीपाडवा येतो घेऊन चैतन्याची पहाट
मराठी नवीन वर्षाचा मग सुरू होतो थाट
उंचच उंच गुढी सजते प्रत्येकाच्या दारात
सुखाची लाट येत सर्वांच्या घरात
मे महिना येताच होते वार्षिक पूजांना सुरुवात
चाकरमान्यांचा किलबिलाट साऱ्यांच्या घरात
सर्वांच्या मनी एकच ध्यास, पूजेला यंदा काय करू खास
मग सुरू होतं कुठे नमन, तर कुठे नृत्य अविष्कार
आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने साऱ्यांचीच होते घाई
विठू माऊलीच्या दर्शनासाठी दिंडी निघते पायी
हरी नामाच्या गजरात वारकरी जातात हरवून
विठू माऊलीच्या भक्तीत सारेच जातात न्हाऊन
आला आला श्रावण महिन्यातील पहिला सण
नागपंचमीच्या दिवशी होते, नागदेवतेचे पूजन
रक्षाबंधनाच्या दिवशी, बहीण भावाला ओवाळते
राखी बांधून भावाला, रक्षण कर म्हणते
बाळ गोपाळांच्या पावलांनी, मग येतो गोकुळाष्टमीचा सण
जो जो रे बाळा म्हणत होते नंदलालाचे आगमन
थरावर थर चढवत घातला दहीहंडीचा घाट
चिमुकल्या हातांनी फोडले दह्यादुधाचे माठ
ढोल ताशांच्या गजरात येतो मग गौरी-गणपतीचा सण
सेवेत बाप्पाच्या लागती सारे भक्तजण
गौरी मातेचे आगमन होता निसर्ग येतो खुलून
गण - गौरीच्या दर्शनाने साऱ्यांचे उर येते भरून
येतो नवरात्रीचा सण घेऊन नवदिवसांची रास
गाव सारा सज्ज होतो खेळण्यास गरबारास
महापुरुषाचे मंदिर सजले आगमन झाले मातेचे
सेवा करण्यास मातेची मन अधिर झाले साऱ्यांचे
दसरा-दिवाळीचा सण येता, वाहती आनंदलहरी
घरं सजली, मंदिरं सजली, सजले तोरण दारी
सुख चैतन्याची लाट आली, दीप लागले दारी
लक्ष्मी मातेच्या पूजनाने दीप लागले घरोघरी
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपमाळ सजते
दिवांच्या प्रकाशात गाव सारे उजळते
फुलांची होते आरास, पालखी नाचते
गाव सारा तल्लीन होतो, नाट्यनमन सजते
कुलदैवत ते गावाचे, रवळनाथ आहे उभा
इवल्याश्या गावाच्या सदैव पाठीशी रहा देवा
कोकणातील असंही सुंदर, एक माझं गाव
सर्वांना आपलेसे वाटणारे पालू त्याचे नाव,
माझं गाव ! माझं गाव
- रविना गावडे (सांताक्रूझ, मुंबई).
𐩘𐩘𐩘
या हो ! माझ्या गावाला..!
या हो ! या हो! पाव्हने तुम्ही, या हो माझ्या गावाला
टूमदार कमानी ओलांडा; तेव्हा गाडी लागेल शिवेला
वेशीवरती आहे; श्री रवळनाथ देवाचे मंदिर
दर्शन घ्या तयाचे; मुर्ती पुरातन सुंदर
वेशीतून शिरा आत; तिच्यावर आहे चावडी
सभोवतालचा परिसर म्हणजे; आमची गाडे वाडी
या की जरा पुढे; पहा दवाखाना सरकारी
पंचक्रोशीचे रुग्ण इथं येती; होण्यासाठी बरी
डाव्या हाताला लागेल; शाळेची इमारत कौलारू
ग्रंथालय अभ्यासिक तेथे सूर; तुम्ही बोला हळू
थोडं वरच्या बाजूला या; लागेल तुम्हाला बावडी
तेथे आहे आमची; सुंदर गावकर वाडी
पुढे येताच मनी वाटे ; प्रसन्नतेचा झंकार
ते पहा श्री महापुरुष देवाचे; मंदिर सुंदर
मंदिरा सभोवती आहे; हिरवळ सुंदर झाडी
तेथेच वसली आहे; आमची नामे वाडी
कित्येक आहेत; कौलारू वाड्या टूमदार
पहावं तिकडं फक्त; हिरवं-हिरवं गार
नदीच्या प्रवाहासम अगदी कुठे ही जावं
म्हणजेच माझं पालू गाव; माझं गाव
- पाषाणभेद
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• माचाळ - मिनी महाबळेश्वर - पावसाळ्यातील एक प्रेक्षनिय सहल
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.