ग्रामपंचायतीचे विसर्जन | महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४५ Gram Panchayat Visarjan In Marathi ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळताना ग्रामपंचायतीने किंवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी असक्षमता दाखवली तर ग्रामपंचायत अधिनियम कायद्यात सरपंच अविश्वास ठराव, ग्रामपंचायत सदस्य अपात्रता यांसारख्या कलमांची तरतूद आहे. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायत तीचा कार्यभार सांभाळण्यास सक्षम नसेल तर शासनाकडून ग्रामपंचायतीचे विसर्जन Gram Panchayat Immersion करण्यात येते.
ग्रामपंचायतीचे विसर्जन म्हणजे काय?
ग्रामपंचायत अधिनियम कायद्यान्वये वेळोवेळो निर्देशित केलेली कार्य, कर्तव्ये व जाबाबदाऱ्या पार पाडण्यास ग्रामपंचायतीने कसूर केली किंवा अशी ग्रामपंचायत सक्षम नसेल तर तिला राज्य शासनाकडून ग्रामपंचायत म्हणून कार्यरत राहण्यास अपात्र ठरविण्यात येते. म्हणजेच, ग्रामपंचायतीचे विर्सजन होते. ग्रामपंचायतीचे विर्सजन करण्याचा अधिकार राज्य शासनास असतो.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम च्या कलम १४५ अन्वये ग्रामपंचायतीचा निर्धारती असलेला ५ वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच खालील कारणांसाठी ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार राज्य शासनास कायद्याने दिला आहे.
१. एखादी ग्रामपंचायत आपल्या अधिकार मर्यादांचे उल्लंघन करीत असेल किंवा अधिकारांचा दुरूपयोग करीत असेल.
२. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये तिला घालून दिलेली कर्तव्य पार पाडण्यास ती सक्षम नसेल किंवा आपली कर्तव्य पार पाडण्यात ती कसूर करीत असेल.
३. ग्रामपंचायत अधिनियमान्वये कलम १२४ मध्ये निर्देशित केलेले कर (Tax) बसविण्यात किंवा वसुली करण्यात ती कसूर करीत असेल.
४. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाची ती दुराग्रहाने अवज्ञा करीत असेल.
५. या अधिनियमाखालील लेख्यांची लेखापरीक्षा किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या आणि कामाच्या निरीक्षणा संबधी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा कोणताही सक्षम प्राधिकारी किंवा राज्य शासन यांनी दिलेल्या आदेशांकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष करीत असेल.
६. एखाद्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या झाल्या असतील तर राज्य शासन शासकीय राजपत्रातील आदेशान्वये अशी ग्रामपंचायत विसर्जित करू शकते.
वरीलपैकी कोणत्याही कारणासाठी एखादी ग्रामपंचायत दोषी आहे असे राज्य शासनाचे मत तयार झाले असेल तर, राज्य शासन जिल्हा परिषदेशी विचारविनिमय करून अशा ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते.
परंतु, कोणत्याही ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्यापूर्वी राज्य शासनाने तिला आपले स्पष्टीकरण देण्याची किंवा बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक असते.
ग्रामपंचायत विसर्जनाची आणखी काही कारणे:
राज्य शासन आणखी काही कारणांसाठी ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते. ती कारणे पुढीलप्रमाणे:
१. गावाच्या सीमांत फेरफार :
जेव्हा एखाद्या ग्रामपंचायतीच्या कालावधीत त्या गावाच्या सीमांत फेरफार केले जातात तेव्हा विभागीय आयुक्त लेखी आदेशाद्वारे त्या ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकतो.
अशा प्रकारे ज्या गावाची ग्रामपंचायत विसर्जित करण्यात आली असेल त्या गावासाठी ग्रामपंचायतीची फेरफार रचना केली जाते किंवा नव्याने ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.
२. एखादे क्षेत्र गाव असण्याचे बंद झाल्यामुळे:
एखादे क्षेत्र गाव म्हणून असण्याचे बंद झाल्यावर त्या गावाच्या ग्रामपंचायतीचे विसर्जन केले जाते. धरण किंवा अन्य प्रकल्पांमुळे काही वेळा अनेक गावांचे पुनर्वसन करणे आवश्यक ठरते. अशा वेळी गावाच्या सीमा बदलल्यामुळे किंवा ते क्षेत्र गाव म्हणून असण्याचे बंद झाल्यामुळे तेथील ग्रामपंचायती त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच विसर्जित होत असत. परंतु १७ जून २००३ च्या अध्यादेशानुसार अशी ग्रामपंचायत आता विसर्जित न होता पुनर्वसित गावात तिचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहू शकणार आहे.
ग्रामपंचायत विसर्जनाचे परिणाम:
एखादी ग्रामपंचायत वरीलप्रमाणे कारणांमुळे विसर्जित झाल्यास त्याचे परिणाम पुढीलप्रमाणे घडून येतात.
१. ग्रामपंचायत विसर्जनाच्या आदेशात नमूद केलेल्या तारखेपासून त्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना व पदाधिकारी यांना आपली पदे सोडावी लागतात.
२. विसर्जनाच्या कालावधीत राज्य शासनाकडून वेळोवेळी ज्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते आशा व्यक्ती त्या ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकारांचा वापर करतात व तिची कर्तव्य पार पडतात.
३. विसर्जनाच्या कालावधीत त्या ग्रामपंचायतीची सर्व मालमत्ता राज्य शासनाच्या अधिन होते.
विसर्जित ग्रामपंचायतीची निवडणूक:
अधिनियमातील वरील तरतुदीच्या अंतर्गत एखाद्या ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्यात आले असेल तर तिच्या विसर्जनाच्या तारखेपासून सहा महिन्यांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्या पंचायतीची नव्याने निवडणूक घेणे बंधनकारक असते. तथापि अशा निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा विसर्जित ग्रामपंचायतीच्या उर्वरित कार्यकाइतकाच असतो. म्हणजे जर विसर्जित ग्रामपंचायतीचे विसर्जन झाले नसेल तर ती पुढे जितक्या कालावधीपुरती अस्तित्वात राहिली असती तितक्याच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल असतो.
माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्कीच शेअर करा.
हे देखील वाचा : Pm Kisan 8th Installment date Marathi पीएम किसान सन्मान निधी योजना 2021
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• नवीन ग्रामपंचायत स्थापना निकष व अटी
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.